वर्षभरात रेल्वेखाली ५० जणांचा गेला जीव

Foto

औरंगाबाद- दिवसेंदिवस रेल्वे पटरी म्हणजे जीव देण्याचे ठिकाणच बनलेले दिसत आहे. अनेक जणांच्या आत्महत्या रेल्वेखाली झाल्या आहेत. वर्षभरात तब्बल ५० जणांचा रेल्वेखाली जीव गेल्याची माहिती रेल्वे पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

सध्या मानसिक तणावामुळे आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचबरोबर नकळतपणे रेल्वे पटरी ओलांडतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय रेल्वेचे नियम न पाळता पटरी ओलांडतानाही अनेक जण रेल्वेखाली सापडले आहेत. वर्षभरात सेलू ते रोटेगाव या हद्दीत तब्बल ५०  व्यक्‍तींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातील २३ जणांची अद्याप ओळख पटली नाही.  

रेल्वेखाली सापडल्याने अनेकांची ओळखच रेल्वे पोलिसांना पटली नाही. २३ व्यक्‍तींची अनोळखी व्यक्‍ती म्हणून रेल्वे पोलिसांत नोंद केली आहे. २३ व्यक्‍तींचा जीव गेला पण त्यांच्या नातेवाईकांपर्यंत ओळख न पटल्यामुळे माहितीच गेली नाही. त्यामुळे अजूनही ते नातेवाईक आपल्या व्यक्‍तीचा शोध घेत असतील, अशी शक्यताही रेल्वे पोलीस विभागाकडून वर्तविली जात आहे.